ज्याच्याविना जगूच शकणार नाही
असं वाटतं
अशा जिवलगाने
त्याचं सगळं प्रेम
पूर्वलक्षी प्रभावासह
सहजपणे मोडीत काढावं
आणि त्याच्या डोळ्यात उरावं
फक्त साता जन्मांचं अनोळखीपण
तशी भासते कविता
कधी कधी.
येतच नाही मुठीत
अशावेळी चांदणभरल्या आभाळाचं
तेजस्वी समाधान
कित्येक दिवस जातात दैनंदिनीच्या
चक्रात गुरफटून
जगरहाटीच्या गाड्यासोबत फरफटत
समोर धो धो कोसळत
असतो
वळवाचा पहिला पाऊस
जगलेल्या सुमधुर क्षणांच्या
आठवणींचा दरवळ आणणाऱ्या मृद्गंधासह
आणि तरीही मी उभी असते
अगदी कोरडीठक्क
डोळ्यांनीच नव्हे,
तर मनानेही.
मेंदुतलं प्रतिभेच रसायन
शोषून घेतलं कामाच्या ताणाने,
की प्रॅक्टिकल जगात
टिकून राहण्याच्या भीतीने
मीच बनवलं स्वतःला
गुळगुळीत दगड?
कळत नाही काहीच!
सगळ्यांनी लाथाडल्यावर
जी एकमेव धृवजागा उरते
माझ्या आयुष्यात
तीच अशी एकाएकी नष्ट
कशी होऊ शकते?
पण असं वाटत असतानाच
आयुष्य घेऊन येतं
एखादा हृदयस्पर्शी क्षण
आणि प्राजक्ताच्या सड्यासारख्या
भरभरून बरसू लागतात कविता.
मधला वांझोटा काळ
मागे सारत कविता परत
येते
'मी आहेच कायम सोबत'
याची ग्वाही देत,
तप न करताही मिळालेल्या
धृवजागेच्या वरदानासह.
कविता असतेच आपली!
ती नाही सोडून जात
विश्र्वासघातकी प्रियकरासारखी
झऱ्यासारखी वाहत राहते ती
आपल्यातून
आपलाच एक भाग असल्यासारखी,
नव्हे,
तर आपणच असल्यासारखी.
..............................................................................................
No comments:
Post a Comment