येणारच तू भेटण्यास तर
जिवलग प्रियकर होऊन ये
धूसर स्वप्नील स्वरासारखा
उत्कट आतुर होऊन ये
क्षण क्षण चुंबित असता चालत
सुंदर यात्रा जगण्याची
त्या धुंदीतच अस्फुट घुमू दे
साद तुझ्या हुंकाराची
आस्वादाच्या शतधारांची
शिरी बरसता बरसात
अमृतवेळी त्या कायेवर
फिरव तुझा प्रेमळ हात
नसानसातून वीज अनामिक अनिर्बंध खेळत असता
मस्तकातील मत्त तुफाने दिशा नवी शोधीत असता
दिसण्यापलीकडचे बघण्याचा असता डोळ्यांना ध्यास
मिळता आनंदाच्या गीतां आर्त वेदनेची आस
पापणीतूनी स्वप्न उतरते
तसाच अलगद अवचित ये
जगा न कळता .. मला न कळता ,,
स्वतः तुला हि नकळत ये ....
.......................................................................
No comments:
Post a Comment