Saturday, 4 April 2026

From an article on Dr. Baba Adhav : By Dr. Anil Awchat

 Dr. Baba Adhav, founder of 'Hamal Panchayat' and pillar of Maharashtra's social reforms and labor movement passed away in December 2025. 

.........................................................................................................

सुनंदाच्या दवाखान्याच्या मागची खोली बाबांची. तिथे फोन होता. वस्तीतले अनेक गोरगरीब गाऱ्हाणी घेऊन यायचे. वस्तीतल्या लोकांच्या एक ना अनेक तक्रारी. पोटमाळ्यावरचा भाडेकरू मालकाने त्याला कारण न देता हुसकावून लावलं असं सांगायचा. त्यांचं म्हणणं ऐकून बाबा उसळून उठायचे. थेट त्या मालकाला भेटून यायचे. प्रश्नाचा निचरा केल्याशिवाय ते स्वस्थ बसायचे नाहीत. एकदा वस्तीतला एक माणूस सीरियस झाला. त्याला ससूनला न्यायला ॲंब्युलन्स मिळेना. गाड्या तर कुणाकडेच नव्हत्या. तो भाग हमालांचा आणि गोदामांचा. रस्त्याच्या कडेला पोती वाहणारी हातगाडी उभी होती. बाबांनी त्यावर या माणसाला निजवलं आणि ते स्वतः हातगाडी ओढू लागले. ते पाहून बाकीचे धावून आले. त्यांनी बाबांना बाजूला करून त्या माणसाला ससूनला पोहोचवलं.
बाबा महाराष्ट्रात कुठेकुठे एसटीने फिरायचे. रात्री - अपरात्री यायचे जायचे. त्यांच्या पत्नी शीलाताई नर्स होत्या. त्या सकाळी उठून कामाला जात. त्यानंतर बाबा घराच्या चौकात कपडे धूत बसायचे. धुऊन दोऱ्यांवर वाळत टाकलेले ते शुभ्र कपडे मला अजूनही आठवताहेत. संध्याकाळी दवाखान्यात आल्यावर पाहावं तर बाबांची वळकटी पुन्हा तयार. आदल्या दिवशी कुठून आले तर अमरावतीहून. आता कुठे चालले तर निपाणीला. तिथल्या बायकांचं काही प्रकरण उद्भवलंय, ते जाऊन समजून घ्यायला हवं असं म्हणत. सगळ्या रातराण्या यांना प्रसन्न. ते कुठूनही येऊन कुठेही जाऊ शकत. त्या वेळी सगळ्या गावांमध्ये थेट गाड्या तरी होत्या का ? कसलं काय ! पण या गाडीने चौफुल्यापर्यंत जाऊ, तिथे दुसरी गाडी पकडू, असं सहज म्हणत. एसटी गाड्यांची अवस्था तर अशी की प्रवासात पाठ खिळखिळी होऊन जाई, पण बाबांच्या चेहऱ्यावर त्याचा मागमूसही नसे. जणू पुण्यातच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालल्यासारखे ते गावांची नावं घेत…
मार्केट यार्डात हमाल भवन उभं आहे. तीन मजली. मजबूत. ते कसं उभं राहिलं माहितीय ? बाबा तुरुंगात असताना हमालांनी ते बांधून घेतलं. प्रत्येकी 250 रुपये वर्गणी काढली. हे हमाल भवन म्हणजे त्यांच्या अस्मितेचं प्रतीक. इतर ठिकाणच्या युनियन आपण बघतो. पण इथे छोटंमोठं कुणी नाही. उपाध्यक्ष असलेले मानकर रोज 100 किलोचं पोतं उचलून हमाली करतात. तसेच सगळे पदाधिकारी…

No comments:

Post a Comment