Sunday, 14 December 2025

Chinmay Damle's (slap of a ) post on Facebook : Indigo affected INDIA vs COVID affected Bharat

इंडिगो आणि भारत सरकार यांनी गेले काही दिवस घातलेल्या घोळामुळे हजारो लोकांची गैरसोय झाली. हे लोक २०२० साली लॉक्डाऊनमध्ये आपापल्या घरी सुरक्षित होते. विमानतळावर अडकून पडलेल्या, विमानं रद्द झाली म्हणून इतर मार्गांनी प्रवास करावं लागलेल्या लोकांच्या कैकपट अधिक लोक त्यावेळी रस्त्यावर होते. शेकडो किलोमीटर चालत आपापल्या घरी गेले.

विमानं नसल्यामुळे अडचणीत सापडलेल्या लोकांसाठी रेल्वेनं खास गाड्या सोडल्या आहेत. त्यावेळी सरकारनं मजुरांसाठी रेल्वे सोडाव्या म्हणून कित्येकांना अनेक दिवस विनवण्या कराव्या लागल्या. जेमतेम महिनाभर थोड्या गाड्या गेल्या. मग गावी जायचं तर तिकिटं काढावी लागली. रेल्वेनं तिकिटांची रक्कमही वाढवली होती.

सातारा-सांगली परिसरात एमआयडीसीत बिहारची मुलं काम करतात. जेमतेम पंधरा - सतरा वर्षांची ही मुलं होती, आहेत. पायी पुण्याला आले. रत्नागिरीहून नवराबायको आणि चार व दोन वर्षांची त्यांची मुलं चालत पुण्याला आली.

एकदा पुण्याहून झारखंडला जाणारी ट्रेन रद्द झाली. त्या गाडीसाठी मुंबईहून एक नवराबायको आले होते. बावीस-चोवीस वर्षांचे होते. आदिवासी. ते पुण्याला आले आहेत, हे आम्हाला माहीत नव्हतं. ट्रेन रद्द झाली हे कळल्यावर तसेच चालत मुंबईला गेले. तिथे मदत मिळेना. पण दोन दिवसांनी चालत परत पुण्याला आले. स्टेशनवर एका संस्थेचे कार्यकर्ते जेवण देत होते. त्यांना हे दिसले. त्यांनी सीवायडीए या संस्थेला फोन केला. त्यांनी मला. त्यांना बिलासपूरला जायचं होतं. एरवी मी चौकशी करत असे. पण या दोन संस्थांकडून माहिती मिळाली म्हणून मी चौकशीच्या फंदात पडलो नाही. त्यांना बिलासपूरला जाणार्‍या एका बसचं तिकीट काढून पाठवलं. शेल्टरहून आमचे एक रिक्शेवाले दादा त्यांना बसमध्ये बसवून आले.

चार दिवसांनी सीवायडीएच्या संजनीचा रागावलेल्या आवाजात फोन आला. मी त्यांची चौकशी केली नाही, म्हणून ती चिडली होती. ते नवराबायको बिलासपूरला पोचले. पण त्यांचं गाव तिथून अडीचशे किमी दूर होतं. तिथे ते पायी गेले होते.

मला अनेकदा फोन करून गावी पाठवा अशी विनवणी करणारं एक कुटुंब होतं. मला त्यांना मध्य प्रदेशातल्या त्यांच्या गावी पाठवता येत नव्हतं. एकदा सोय झाली, त्यांना फोन केला, तर कळलं, दागिने विकून त्यांनी ट्रकवाल्याला पैसे दिले, आणि गावी पोचले.

शेल्टरमध्ये एक भुसावळचे काका होते. त्यांची पाठवायची सोय होत नव्हती. शेवटी एकदा त्यांनी अनुपम बर्वेला धमकी दिली, मला गावी पाठवलं नाही, तर जीव देईन.

पायाच्या ऑपरेशनसाठी पुण्यात आलेले एक नवराबायको अडीच महिने अडीच महिने बसस्टॅण्डवर राहत होते.

डेक्कनला पुलाखालची वसती पोलिसांनी पाडली. ते लोक रस्त्यावर आले. पोलिस रस्त्यावरही राहू देइनात. मग ते मुंबईला निघाले. चालत. स्तेशनवरून येताना एकदा अंशुमान आणि मला त्यातली दोन कुटुंबं दिसली. मग त्यांना परत आणलं आणि रेशन दिलं. पाच ते दहा वयोगटातली विसेक मुलं त्या दिवशी मुंबईला लपूनछपून चालत गेली होती.

म्हातारे आईबाप गावी जाण्यासाठी स्टेशनवर येत, त्यांची मुलं आम्हांला सांगत, त्यांची तिकडेच सोय करा, आमच्याकडे पाठवू नका.

मुलगी दवाखान्यात आहे, म्हणून वाहन नसताना मुंबईला निघालेले म्हातारे आईवडील, औरंगाबादजवळच्या खेड्यात जायला निघालेले पुण्यातले तरुण, असे कोणकोण आठवतात. मे महिन्याच्या उन्हात दोनचारपाच वर्षांची मुलं चालत होती.

त्यावेळी त्यांच्या बाजूनं बोलणारं कोणीच नव्हतं. मजुरांच्या पाठीवर एकच सॅक आहे, म्हणजे लोक सुट्टीसाठी घरी निघाले आहेत, अशीच मध्यमवर्गाची समजूत होती.

विमानतळावर अडकून पडलेल्या कितीजणांना कोव्हिडमध्ये चालत गेलेले मजूर आठवले असतील, कोण जाणे.

 

No comments:

Post a Comment