Friday, 5 December 2025

' झाडात पुन्हा उगवाया ' - या जाई गुलमोहर (आपटे) यांच्या वाघूर ( दिवाळी 2022) मधील लेखामधून

माझी अशी इच्छा आहे कि जगातल्या प्रत्येकाकडे एक असे झाड असावे ज्याकडे आपण दुःखी असताना किंवा जगाशी भांडण झालेले असताना हक्काने जाऊ शकू. ज्यापाशी आपण जगाला सांगू शकत नाही अश्या वेदना सांगू शकू. पण असे झाड घरी बसल्या बसल्या मिळत नाही. आपले झाड मिळवणे म्हणजे आपल्या आयुष्याचा जोडीदार मिळवण्यासारखेच जिकिरीचे काम आहे. असे झाड मिळवण्यासाठी असंख्य झाडांचे पर्याय आपल्या समोर असायला हवेत. स्वतः कष्ट करून कमावलेली झाडांची वनराई असावी किंवा आपल्या पूर्वजांच्या कृपेने मिळालेली किंवा जतन केलेली असंख्य झाडांची संपत्ती असावी. हि झाडे कुणाच्याही मालकीची नाहीत, त्यांचे अस्तित्व आपल्याशी बांधील नाही याची पूर्ण जाणीव ठेवून मग त्या झाडाचा शोध करावा लागतो. अनेक झाडांच्या समूहातून वाट काढत काढत, "त्या" झाडाचा पत्ता इतर झाडांना विचारत विचारत मार्ग शोधावा लागतो. आणि अश्या झाडाचा पत्ता फक्त इतर झाडेच देऊ शकतात. अतिशय दाटीवाटीने वाढलेल्या शहरात एक छोटेसे खोपटे शोधण्यासारखे आहे हे. तिथपर्यन्त पोचायला अनेक जणांची मदत घ्यावी लागते. एकच एक झाड बरोब्बर पत्ता देऊ शकत नाही. त्यासाठी शेकडो झाडांशी ओळख करावी लागते. त्यांच्या ओळखीतून एक झाड आपल्याला दुसऱ्या झाडाकडे नेते, मग दुसरे तिसर्याकडे.... पण जर आपल्या आजूबाजूस झाडांची संख्याच अतिशय मर्यादित असेल तर...? मग झाडांना आपले करता येते हेच आपल्याला कळत नाही. त्यामुळे आपल्या ललाटी असे एखादे झाड लिहिले आहे हे देखील लक्षात येत नाही आणि त्याचा शोधही केला जात नाही. मग अश्या वेळी झाडे आपल्या आयुष्यात आपण घरात असताना रस्त्यावरून वाहत जाणाऱ्या ट्रॅफिकच्या आवाजासारखी वाटतात. त्या बॅकग्राऊंडमधील आवाजाचे संगीत बनत नाही. पण काहीवेळेस काही झाडे आपल्या मनात तेवत राहतात. हा लेख अश्या तेवत राहणाऱ्या झाडांना अर्पण करत आहे. 



No comments:

Post a Comment