सुखात, दुःखात, वेदनेत, निराशेत
आनंदात, त्राग्यातसुद्धा एकत्र आलेली मनं
जोडली गेलेली नाती
आतल्या कप्प्यात जपलेली प्रेमानं सिंचलेली
कधी झालेली जन्मांतरीची
कधी उसवून गेलेली
होतात अचानक अनावर आटोक्याच्या पलीकडं
बांध तोडून सुटतात सैरावैरा
पसरतात सगळीकडं
काही नाती, मनाचा ओलावा लपेटलेली
कधी दुरावा सहन करणारी, तरी
कोरडेपणात हिरवाई जपलेली
रुजून उगवतात त्यात शब्दांचे अंकुर
पांढरे काळे हिरवे लाल गुलाबी
काही लुभावने, काही जीवघेणे
येतात एकत्र, बनतात शब्द
उतरतात माझ्या मनातून कागदावर
पोचतात तुझ्या मनापर्यंत
आणि आपसूकच
होतात त्यांच्या कविता
.....................................................................
No comments:
Post a Comment