नको तुझा मोह
खुणावतो डोह
उगाचच...
उगाच लांघली
मनाची या वेस
तुझ्याच दिशेस
झेपावण्या...
झेपावली रात्र
पिसाटापरीस
त्यात ये भरीस
हाक तुझी...
हाक नको देऊ
कोसळतो धीर
तुझ्यात लागीर
जीव होतो...
होतात मनाच्या
लाख लाख ओळी
त्यात ही आरोळी
कवितेची...
कवितेच्या नावे
तुलाच लिहिले
आणि गिरवले
आठवांना...
आठवांचे ढग
येतात कधीही
माझी लाहीलाही
नेहमीची...
नेहमी जपला
अंधार कोवळा
तुझ्या-माझ्यातला
फुलापरी..
फुलांत गोवला
शब्द शब्द माझा
जसा सुई धागा
एकरूप...
............................