आपण लिहिलेले संवाद नीट विचार करून , त्यांना आत्मसात करून आंतरिक शहाणीव त्यात मिसळून कॅमेऱ्यासमोर बोलणारी नीना अजुनी माझ्यासोबत आहे त्यामुळे विजयाबाई अजुनी आहेत आपल्यात. तसेच समोर धरलेला क्लॅपबोर्ड बाजूला जाताच आपल्या संवेदनशील चेहऱ्याने आणि हळव्या मनाने लिखित संवादांना आकार देणारी सोनाली आहे माझ्यासोबत म्हणून दुबे सुद्धा आहेत आपल्यात.
तीच गोष्ट वैभव तत्ववादी आणि सचिन खेडेकरची. पटकथेकतील ओळींच्या मधील शांतता ओळखणारे मन. लिखित वाक्यातील सबटेक्स्ट अचूक पकडण्यासाठी मेहनत करणारी माणसे. कुणाकडून शिकली असतील हि माणसे त्यांच्यात असलेली शिस्त , त्यांच्यात असलेला कॅमेऱ्याची जाणीव? कुणाकडून शिकला असेल सचिन खेडेकर प्रत्येक वाक्यावर मेहनत घ्यायला?
ज्यांच्याकडून वैभव आणि सचिन शिकले, सोनाली, नीना शिकल्या ती माणसे आमच्या पिढीसोबत सुद्धा अजुनी काम करीत आहेत. ही माणसे तोवर संपणार नाहीत तोवर त्यांनी त्यांच्या शिष्यांमध्ये पेरलेले गुण आपल्या भाषेचे नाटक आणि आपला सिनेमा समृद्ध करीत आहेत. दुबे . विजयाबाई , तेंडुलकर कायमच सोबत आहेत.
तुम्हाला आठवणारी शेवटची व्यक्ती संपली कि तुम्ही अस्तंगत होता. तोवर नाही.
................
No comments:
Post a Comment